GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा 'उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी' पुरस्कार जाहीर

उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा 'उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी' पुरस्कार जाहीर

 मतदार नोंदणीच्या उदगीर पॅटर्नची राज्यभरात चर्चा : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांनी केले कौतुक

उदगीर : 2024 हे वर्ष प्रामुख्याने निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे, ज्यामध्ये लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षात येऊ घातल्या आहेत. निवडणुका म्हटलं की त्यासाठी वापरली जाणारी मतदार यादी ही अद्ययावत असणे फार आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वर्षभर चालते. ज्यामध्ये नवमतदारांची नोंदणी, मयत व दुबार मतदारांची वगळणी तसेच मतदाराचा तपशील दुरुस्तीबाबत काम चालते.
     उपविभागीय अधिकारी उदगीर हे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहतात. उदगीर मतदार संघाच्या मतदार यादी मध्ये महिलांच्या व युवकांच्या मतदार म्हणून नोंदणीचे प्रमाण खूपच कमी होते. ही बाब उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी युवक मतदार नोंदणी मध्ये उदगीर मतदार संघातील 58 शाळा - कॉलेज वर सुमारे सात हजार विद्यार्थ्यांची नव मतदार म्हणून नोंदणी पूर्ण केली.
 तसेच उदगीर मतदार संघाचे लिंग गुणोत्तर 887 होते जे की इतर मतदारसंघ व राज्याच्या सरासरीपेक्षा खूपच कमी होते कारण महिला मतदारांचे प्रमाण कमी होते.  त्यामुळे उपविभागीय अधिकारी उदगीर यांनी उदगीर मतदार संघातील एक लाख 95 हजार महिलांचे सर्वेक्षण बचत गट प्रतिनिधी व अंगणवाडी ताई यांच्यामार्फत करून घेतले,  ज्यामध्ये 9500  मतदार नोंदणी न केलेल्या महिला आढळून आल्या. ज्यांची लगेचच बीएलओ मार्फत मतदार नोंदणी पूर्ण करून घेण्यात आली. त्यामुळे उदगीर मतदार संघाचे लिंग गुणोत्तर 887 वरून 911 म्हणजे तब्बल 24 ने वाढले आहे. याबद्दल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यापूर्वीच उदगीर मतदार संघाचे या कामाबद्दल कौतुक केले होते.  अशाप्रकारे उदगीर मतदार संघामध्ये जून 2023 ते डिसेंबर 2023 या सहा महिन्यांमध्ये 18000 नव मतदारांची नोंदणी पूर्ण करून घेण्यात आली. 
  गेल्या सहा महिन्यांमध्ये  उदगीर मतदार संघातील तहसीलदार, नायब तहसीलदार,  मंडळाधिकारी,तलाठी, अंगणवाडी ताई, बचत गट प्रतिनिधी आणि सर्व बीएलओ यांनी केलेल्या अविरत आणि अचूक कामामुळे हा पुरस्कार मिळाल्याची प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी श्री. सुशांत शिंदे यांनी दिली.
 उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुशांत शिंदे यांचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी विशेष अभिनंदन केले तसेच उदगीर व पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उदगीर मतदार संघाचे लिंग गुणोत्तर 887 वरून 911 असे तब्बल 24 ने वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये 7000 युवक आणि 9500 महिला व इतर मतदार अशी एकूण 18 हजार नवीन मतदारांची नोंदणी उदगीर मतदारसंघांमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी देखील शिफारस करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments