निडेबन ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल
उदगीर : उदगीर शहरालगत असलेल्या
निडेबन ग्रामपंचायत ही उदगीर तालुक्यातील महत्वाची ग्राम पंचायत आहे. १५ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधील १२ सदस्यांनी सरपंच व उपसरपंच यांच्याविरोधात बुधवारी दि. १७ जानेवारी रोजी अविश्वास ठराव उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे दाखल केला आहे. या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दि. २९ जानेवारी रोजी विशेष सभा बोलावली आहे.
निडेबन ग्रामपंचायतीच्या १२ सदस्यांनी सरपंच जयश्री प्रभाकर बेल्लाळे आणि उपसरपंच अत्तार फय्याज अब्दुल रशीद यांच्या विरोधात बुधवारी तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केलेली आहे.
या १२ सदस्यांनी सरपंच व उपसरपंच यांच्यावर अनेक आरोप करुन केले आहेत. त्यात सरपंच विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, ग्रामनिधी व १५ व्या वित्त आयोगामध्ये पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करणे, आई सरपंच असताना मुलाने ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करून ढवळाढवळ करणे, ग्रामस्थांच्या प्रमाणपत्रावर सह्या करण्यास टाळाटाळ करणे असे आरोप करण्यात आले आहेत. तर उपसरपंचाविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करणे, राष्ट्रीय सण
आणि महापुरुषांच्या जयंतीस नेहमी गैरहजर राहणे, मासिक बैठकीमध्ये सरपंच असताना उपसरपंचानी सदस्यांना उद्धटपणे बोलणे, बेकायदेशीर नामांतर करण्यास ग्रामसेवकावर दबाव आणणे असे आरोप १२ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या नोटिशीमध्ये नमूद केलेले आहेत. निडेबन ग्रामपंचायतीच्या १२ सदस्यांनी सरपंच व उपसरपंचावर अविश्वास ठराव तहसीलदार यांच्याकडे दाखल केला असून ठरावाच्या नोटीसीवर ग्रामपंचायत सदस्य पाटील रणजीत मल्हारी, जाधव धनाजी ज्ञानोबा, सोमवंशी सुनील गोपीचंद, सोमवंशी अभिजीत मल्हारी, तोबरे विद्यावती काशिनाथ, पाटील सिंधुताई पांडुरंग, अनंतवाळ वर्षाराणी संदीप, कोयले विजया अशोक, जाणते सुनीता सिद्रामप्पा, चिलकलवार सुरेखा चंद्रकांत, शिंदे पुष्पा दशरथ, पाटील प्रियंका रंजीत यांच्या यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निडेबन ग्रामपंचायतीच्या १२ सदस्यांनी सरपंच व उपसरपंचावर दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दि. २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालय निडेबन येथे विशेष सभा बोलावलेली आहे. या बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत काय होते? याकडे निडेबन गाव व परिसरातील नागरिकांचे आणि राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
0 Comments