GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक हित जोपासले जाते - प्राचार्य डॉ.सुधीर जगताप

राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक हित जोपासले जाते - प्राचार्य डॉ.सुधीर जगताप


उदगीर : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो. युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करता येते. आपल्या देशाबद्दल, नागरिकाबद्दल आपुलकी, प्रेम भावना निर्माण होते. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्टे हे सामजिक कार्य करणे हा असतो. या कार्यातून सामजिक हीत जोपासले जाते. महाविद्यालयाचा परिसर, आपल्या शहराचा, नगराचा परिसर स्वच्छ करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, प्रथमोचार सबंधी महिती, नागरिक संरक्षण, पर्यावरण संवर्धन इ. कार्यक्रमाचा समावेश राष्ट्रीय सेवा योजनेत असतो. असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी केले.
       येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सुधीर जगताप बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ. धनंजय गोंड, परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ. शेषनारायण जाधव, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कार्यक्रमाधिकरी पुरस्कार प्राप्त रासेयो विभागाचे प्रमुख प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, संगणक शास्त्र विभागातील प्रा. राशिद दायमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
      पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. सुधीर जगताप म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील परिसराची स्वच्छता, सुधारणा, आरोग्य, कुटुंब नियोजन, सामाजिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या लोकांची कामे करण्यावर भर देण्यात येते. यातून युवा शक्ती देश घडविण्यात किती महत्वपूर्ण योगदान देते हे आपणास दिसून येते. युवकांनी मोठ्या संख्येने या कार्यात सहभागी झाले पाहिजे. ज्यामुळे त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, समाज सेवा ही मूल्ये रुजतात तर स्वच्छता,आत्मनिर्भरता, जबाबदारी आपुलकी, प्रेम इ. गुण अंगी निर्माण होतात. रासेयो चे ब्रीदवाक्य 'माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी' हे आहे. याप्रमाणे प्रत्येक युवकात समर्पणाची भावना निर्माण होते असे ही ते म्हणाले.
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना प्रा. अमर तांदळे म्हणाले की, महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाची सुरुवात 2003 साली झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत या विभागाच्या माध्यमातून उदगीर व आजू-बाजूच्या परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार विद्यापीठाकडून येणाऱ्या माहिती प्रमाणे नियमित व विशेष शिबिराचे आयोजन विभागाद्वारे केले जाते. महाविद्यालयात 100 विद्यार्थ्याचे युनिट ची मान्यता असून प्रत्येक विद्यार्थ्याकडून वर्षातून किमान 120 तास काम करून घेतले जाते. नुकतेच रासेयो चे विशेष शिबिर हत्तीबेट (देवर्जन) येथे संपन्न झाले. या विशेष शिबिरात संपुर्ण हत्तीबेट परिसराची स्वच्छता करण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले तसेच या विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने वर्ष 2017 रोजी राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट महाविद्यालय व उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या विभागाच्या मार्फत होणाऱ्या सामाजिक कार्यासाठी संस्था व महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे सदैव मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. असे ही प्रा. अमर तांदळे म्हणाले.
    या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. राहुल पुंडगे यांनी तर आभार प्रा. ऋतुजा दिग्रसकर यांनी मानले. यावेळी प्रा.आकाश कांबळे, प्रा.संजीवनी भालेराव, प्रा.असिफ दायमी, प्रा.आवेज शेख, प्रा.राखी शिंदे, प्रा.अनुजा चव्हाण, प्रा.त्वरिता मिटकरी, प्रा. नावेद मणियार, प्रा. सोनल सोनफुले, अमोल भातकुले, अपर्णा काळे यांच्यासह रासेयो चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments