GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लोकशाही मूल्यांचे बीजारोपण करणारा राजा : छत्रपती शिवाजी महाराज - डॉ. कमलाकर गव्हाणे

लोकशाही मूल्यांचे बीजारोपण करणारा राजा : छत्रपती शिवाजी महाराज - डॉ. कमलाकर गव्हाणे 

उदगीर : छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा सरंजामशाही व राजेशाहीचा काळ होता. शिवाजी हा सुद्धा सरंजाम शाहीतलाच राजा होता;परंतु शिवाजी महाराजांनी बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर सर्व शाहयांशी संघर्ष करून तसेच स्वकीयांशी लढून एकसंघ अशी मराठा सतेची मुहूर्तमेढ रोवली. जहागिरदार , देशमुख, वतनदार, पाटील व कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घातला. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहेत असे शिवाजी महाराज सांगु लागले. शिवाजी राजेंच्या रयतेला हे सारे नवे होते. राजा व त्याचे राज्य याकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन बदलू लागला. हा राजा त्यांना आपला वाटू लागला. यातूनच लोकशाही मूल्यांचे बीजारोपण होत गेले असे प्रतिपादन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील सहयोगी प्रा. डाॅ.कमलाकर गव्हाणे यांनी केले. 
ते उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात इंग्रजी विभागातर्फे 'शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याची समकालीन प्रासंगिकता' या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते.
 यावेळी ऑनलाईन वेबिनारमध्ये बोलताना डॉ. गव्हाणे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी यवनांच्या अन्यायी व अत्याचारी राजवटीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी साळी, माळी, तेली, तांबोळी, महार व मांग इत्यादी अठरापगड जातींच्या लोकांना एका झेंड्याखाली एकत्र आणून रयतेचे  कल्याणकारी राज्य निर्माण केले. म्हणून शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याचे लोकशाहीत कौतुक होत आहे. गनिमी कावा व बुद्धी कौशल्याचा वापर करून शत्रूंच्या चारीमुंड्या चित केल्या. यातून मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. हा इतिहास पुढे बखरी, पोवाडा व दंतकथा मधून प्रसारित झाला. तसेच पाठ्यपुस्तके व साहित्यातूनही चित्रित झाला.ते लेखन वास्तववादी नव्हते तर इतिहासाचा विपर्यास करणारे होते. शिवाजी व संभाजी यांचा इतिहास मनोरंजनाचा नसून तो पारतंत्र्याच्या खाईतून सामान्य माणसाला मुक्त करणारा आहे .संत रामदास शिवाजी चे राजकीय गुरू होते, भवानीने शत्रूबरोबर लढण्यासाठी तलवार दिली, दादोजी कोंडदेव हा व्यायाम गुरु होता अशा भाकड कल्पनांना शिवचरित्रात महत्त्व नाही.जेम्स लेन या पाश्चात्त्य इतिहासकारानी केलेली शिवाजी राजाची बदनामी आपण सहन करता कामा नये. या पाठीमागे ब्राह्मणी मेंदू कार्यरत आहे. असे डावपेच आपण हाणून पाडले पाहिजे. तरच मराठ्यांचा खरा इतिहास जनतेसमोर येईल. म्हणून नवदृष्टीचा अवलंब करून इतिहास लेखनाचा आकृतिबंध स्वीकारून मराठ्यांच्या इतिहासाचे लेखन व्हावे असे ते म्हणाले.
 अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जाधव यांनी शिवचरित्रावर प्रकाश टाकताना म्हटले की, शिवाजी हा चारित्र्यसंपन्न, नेतृत्व गुण असणारा, धर्मनिरपेक्ष राजा होता. म्हणून जनतेने त्यांचा मनापासून स्वीकार केला .आपण त्यांनी मांडलेल्या विचारानुसार आचरण केल्यास हा समाज निश्चितपणे सुखी व संपन्न होईल. यावेळी इंग्रजी विभागप्रमुख डाॅ.ए.एम.नवले यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर ग्रंथपाल प्रा.विष्णू पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, आभार उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जगताप यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे, जयंती समितीचे संयोजक डॉ.एस.डी सावंत, स्टाफ सेक्रेटरी
 डॉ.व्ही.के.भालेराव व ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या वेबिनारमध्ये प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments