सावित्रीबाई फुलेंचे कार्यकर्तृत्व समाजासाठी दिशादर्शक - रामचंद्र तिरुके
उदगीर : सावित्रीच्या लेकींनी शिक्षणाचा आदर्श पुढे चालवावा आणि जीवन सार्थकी लागेल, असे कार्य करावे. कारण सावित्रीबाई फुले यांचे कार्यकर्तृत्व संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक आहे, असे मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनविशेष समितीच्यावतीने आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के ( व. म. ), प्रा. शंकर कोडचे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना तिरुके म्हणाले, सावित्रीबाई फुले या समाजाचं भूषण आहेत तसेच त्या विचारांचा तेवत राहणारा नंदादीप आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने आज स्त्री शिक्षणाचा जागर होतो आहे. त्यामुळे सर्वांनी सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेत असलेला शिक्षण विचार पुढील पिढ्यांमध्ये रुजवावा, अशी भावना व्यक्त केली. यावेळी बोलताना डॉ. राजकुमार मस्के म्हणाले, कोणत्याही व्यक्तीचं जन्माच्या मोठेपणापेक्षा कर्तृत्वाचे मोठेपण महत्त्वाचं असतं. त्या अर्थाने सावित्रीबाई फुले या कर्तृत्ववान स्त्रियांचे मूळ आहेत. सावित्रीबाईंच्या शिक्षण विचारात नितीबोध व मूल्य शिक्षणाचा ठेवा आपल्याला पाहायला मिळतो, असे मत मांडले. याच कार्यक्रमादरम्यान इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. माधवी महाके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच समाजसुधारणेचे मर्म स्त्री शिक्षणात आहे. हा सावित्रीबाईंचा विचार इतिहासाचे दाखले देत स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी तर आभार प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी होकरणे, डॉ. अशोक नागरगोजे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
0 Comments