अनंत कदम यांना 'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान' पुरस्कार प्रदान
उदगीर : अनंत कदम यांची जन्मभूमी होळसमुद्र- कर्नाटक तर कर्मभूमी उदगीर महाराष्ट्र असली तरी या दोन्ही राज्यांच्या सीमाभागात लेखन व मराठी भाषेचा प्रसार यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल यांना राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेचा ४ था 'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला विशेष सन्मान २०२६' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोख १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी अकादमीचे मार्गदर्शक, महाराष्ट्राचे माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील होते. सन्माननीय अतिथी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थानचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत अनंत कदम यांना सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध विचारवंत व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या निवड समितीने या सन्मान पुरस्कारांची निवड केली. याबरोबरच साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाकरिता प्रसिद्ध लेखक, अनुवादक मराठी व हिंदी साहित्याचे अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना 'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १ लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी कवयित्री व लेखिका सिसिलिया कार्व्हालो, वसइ, दक्षिण भारतातील मराठी भाषेचे अभ्यासक डॉ. विवेकानंद गोपाल, तंजावर-तामिळनाडू, डॉ.सुरेंद्र दरेकर,अहिल्यानगर, व प्रा.डॉ. रणधीर शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला.
राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) या आमच्या संस्थेच्यावतीने ४था 'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान' पुरस्कार वितरण समारंभ' शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे नुकताच संपन्न झाला.
समारंभावेळी सुचिता कदम , नेहा कदम, दादाराव पाटील, मुरलीधर जाधव, शिवशंकर पाटील , नागोराव भोसले, बालाजी बिरादार , तुकाराम बिरादार, मोहन निडवंचे , वट्टमवार , मोतीराम पांचावरे , अलका पांचावरे, रेखा खोंडे, जाधव ताई, अविनाश ढगे, शिल्पा ढगे, मेघन ढगे , गोविंदराव माने, चित्रा माने याचबरोबर प्रदीप पाटील सदस्य साहित्य व संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य , मनीषा पाटील, अनिल पाटील यांचे सह महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अकादमीचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, बेळगाव व परिसरातील साहित्याचे रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनंत कदम यांना मिळालेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


Post a Comment