उदगीरची शासकीय दूध योजना लवकरात लवकर सुरू व्हावी : आशिष पाटील राजुरकर
उदगीर : येथील शासकीय दूध योजनेच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी
केंद्रीय दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रूपाला हे सोमवारी उदगीर येथे येणार आहेत. उदगीर येथील सद्या बंद पडलेली ही दुध डेअरी पुनरुज्जीवित करण्यासाठी उदगीरातील काही नागरिकांनी पुढाकार घेवुन समिती स्थापन केली होती. या समितीने सदर दुध बुकटी प्रकल्प पुन्हा सुरू व्हावा म्हणून प्रयत्न सुरू केले होते. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करावा म्हणून ही समिती केंद्रीय मंत्र्यांना साकडे घालणार असल्याचे माहिती शनिवारी पत्रपरिषदेत देण्यात आली.
यावेळी आशिष पाटील राजूरकर म्हणाले, येथील शासकीय दूध योजना बंद पडली आणि हा प्रकल्प राज्य शासन मोडीत काढणार असल्याचे समजल्याने उदगीरकरांनी व्यापक बैठक घेतली. त्यानंतर बारा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीने उदगीर शासकीय दूध योजनेचा प्रकल्प पुन्हा सुरू करावा म्हणून सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. त्यासाठी मुंबई, दिल्ली, नागपूर येथे जाऊन मंत्री व अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन साकडे घातले.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खा. सुधाकर श्रृंगारे यांनी समितीला सतत सहकार्य केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे यांनी पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी अजित शिंदे, मोतीलाल डोईजोडे, अहमद सरवर, संतोष कुलकर्णी, अॅड. नरेश सोनवणे, प्रा. एस. एस. पाटील, चंद्रकांत टेगेटोल, ओम गांजुरे, कपिल शेटकार, बबलू जाधव आदी उपस्थित होते.
0 Comments