ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोठे : डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर


समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोठे : डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर 

उदगीरात रोटरी क्लबच्या 'महिला शक्ती' पुरस्काराचे थाटात वितरण 

उदगीर : कुठल्याही क्षेत्रात काम करणारी महिला स्वकर्तृत्वाने पुढे जात असते. यशाचे शिखर गाठत असताना तिला स्वतःचे कौतुक नसते तर समाजाचे भले करण्याचाच तिचा ध्यास असतो, समाजाची सर्वांगीन प्रगती होण्यासाठी महिलांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.

उदगीर येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने श्रीमती स्वर्णमाला मच्छिन्द्र चिद्रेवार 'महिला शक्ती' पुरस्काराचे वितरण डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते रविवारी शुभंकर फँक्शन हॉल येथे पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिदर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आरती रघु यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या उदगीर केंद्राच्या संचालिका ब्र. कु. महानंदा बहेनजी, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन महानंदा सोनटक्के यांची उपस्थिती होती.
यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन ब्र. कु. महानंदा बहेनजी यांचा सन्मान करण्यात आला तर पल्लवी पटवारी, अॅड. बबिता संकाये, दीपा बाहेती, ललिता ठाकूर, बालिका बेलूरे, बालिका सोनटक्के, सुनिता उदेकर या महिलांचा महिला शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानंदा सोनटक्के यांनी केले. 
यावेळी बोलताना ब्र. कु. महानंदा बहेनजी म्हणाल्या की, महिला दिनाच्या दिवशी पुरतेच महिलांचे महत्व न राहता रोजच महिलांचा सन्मान झाला पाहिजे. ज्या घरात महिलांचा सन्मान होतो तिथं लक्ष्मीचा वास असतो असा उपदेशही त्यांनी यावेळी केला.
डॉ. आरती रघु यांनी आपल्या भाषणात महिलांनी कुटुंबाकडे लक्ष देत असताना स्वतःच्या प्रकृतीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी महिलेवर असते असे सांगून डॉ. रघु यानी महिलांमध्ये रक्त कमी होणे, कॅलशियमची कमतरता जाणवणे यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. आज महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग हे आजार वाढत चालले असून हे आजार होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अरुणा अभय ओसवाल अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. जीवन गौरव मानपत्राचे वाचन विक्रम हलकीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगला विश्वनाथे व ज्योती स्वामी यांनी केले तर आभार मोतीलाल डोईजोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, महिला पुरुष, रोटरी क्लब चे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post