उदगीरला १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उभारावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांची मागणी
उदगीर : उदगीर शहर हे एक लाख लोकसंख्येचे कर्नाटक सिमेवरील महत्वाचे शहर आहे. उदगीर हे कर्नाटकातील बिदर तसेच लातूर या दरम्यान आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण असुन सद्यस्थितीत उदगीर येथे २०० खाटांचे सामान्य रुग्णालय कार्यरत असून, त्या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन ३०० खाटापर्यंत करण्याचा प्रस्ताव आपल्या कार्यालयात सादर केलेला आहे. सद्यस्थितीत उदगीर येथील सामान्य रुग्णालयामध्ये दरदिवशी १५०० बाह्य रुग्ण सेवा घेतात. तसेच दरमहा स्वभाविक सिजरियन आशा एकूण ४०० प्रसूती घेतात. सध्याची रुग्णांची जागा रुग्ण संख्येच्या तुलनेत अत्यंत अपुरी पडत आहे. त्याअनुषंगाने उदगीर येथील सामान्य रुग्णालयासाठी १०० खाटांचे स्त्री रुग्णालय नव्याने मंजूर करावे अशी लेखी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देवुन याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना आरोग्य विभागाच्या सळबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सदर १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उदगीरला झाले तर उदगीर शहर व परिसरातील महिलांना दर्जेदार आणि विशेष आरोग्य सेवा उपलब्ध होतील.
उदगीर व जळकोट तालुक्यासह सीमावर्ती भागातील हजारो महिलांना स्त्रीरोग, प्रसूती आणि नवजात शिशू उपचारांसाठी लातूर, धाराशिव किंवा हैदराबाद येथे जावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि गैरसोयींचा मोठा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन उदगीरमध्ये स्वतंत्र १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याची मागणी आ. संजय बनसोडे यांनी केली आहे.
या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक प्रसूती कक्ष, सिझेरियन शस्त्रक्रिया सुविधा, नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU), स्त्रीरोग शस्त्रक्रिया विभाग, सोनोग्राफी, रक्तपेढी, प्रयोगशाळा तसेच अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित परिचारिकां उपलब्ध होतील व त्यामुळे मतदार संघातील माता भगिनींची सोय होणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले आहे.
आ. संजय बनसोडे यांनी यापूर्वी उदगीरमध्ये ट्रॉमा केअर सेंटर, ऑक्सिजन प्लांट, ओपीडी इमारत, २०० खाटांचे सामान्य रुग्णालय, अत्याधुनिक रुग्णवाहिका आदी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची उभारणी ही काळाची गरज असल्याचे त्यांनी या रुग्णालयाची मागणी केली आहे.
हे रुग्णालय उभारल्यास उदगीरसह जळकोटसह परिसरातील हजारो महिलांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळतील. प्रसूतीसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होईल, आर्थिक खर्चात बचत होईल आणि ग्रामीण भागातील महिलांनाही आधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील असा विश्वास आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
***********


Post a Comment