जळकोट येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर
आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश
जळकोट शहरातच होणार विजेच्या तक्रारीचे निवारण
उदगीर : जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून जिल्हयात ओळखला जातो या तालुक्यात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने या तालुक्याचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता. या तालुक्यातील विजेच्या संदर्भातील कामासाठी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे असलेल्या उपविभागीय कार्यालयात जळकोट तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला तेथे जावुनच आपली समस्या मांडावी लागत होती. यामुळे या भागातील नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास होत होता. जळकोट तालुक्यातील नागरिकांना नविन मीटर कनेक्शन, डी.पी.सह विजेच्या विविध कामासाठी शिरुर ताजबंद येथील उपविभागीय कार्यालयात जावे लागत होते.
जळकोट तालुक्यात महावितरणचे उपविभागीय कार्यालय व्हावे म्हणून या तालुक्यातील नागरिकांची अनेक दिवसापासूनची मागणी होती या मागणीचा विचार करून या भागाचे आमदार संजय बनसोडे यांनी ऊर्जा विभागाकडे सतत पाठपुरावा करून जळकोट तालुक्याला स्वतंत्र महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर करून घेतले आहे.
या उपविभागीय कार्यालयात नवीन विविध पदावरचे एकूण बारा पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे या कार्यालयाचा फायदा जळकोट तालुक्यातील सर्व नागरिकांना होणार असुन आता पुढील सर्व महावितरणची कामे आता जळकोटलाच होणार असल्याने नागरिक व शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. शिरूर ताजबंद ग्रामीण उपविभाग, उदगीर ग्रामीण उपविभाग व चाकूर उपविभागाचे विभाजन करुन जळकोट येथे महावितरणचे नवीन उपविभागीय कार्यालय मंजूर करण्यात आले असून आता जळकोट तालुक्यातील विजे संदर्भातील कुठल्याही अडचणीसाठी आता जळकोट उपविभागीय कार्यालयात जाऊन आपल्या समस्या तात्काळ सोडवल्या जातील जेणेकरून या भागातील नागरिकांना त्रास होणार नाही.
जळकोट येथील नव्याने झालेल्या या उपविभागीय कार्यालय अंतर्गत जळकोट शाखा, हाडोळती शाखा व नळगीर शाखा असे एकुण तीन शाखा कार्यालय असणार आहेत. या उपविभागीय कार्यालयाच्या अस्थापनेवर एकुण १२ पदे मंजूर करण्यात आली असुन गेल्या अनेक वर्षानंतर जळकोट तालुक्यातील नागरिकांची उपविभागीय कार्यालयाची मागणी मंजूर झाल्याने या भागातील नागरिकांनी आमदार संजय बनसोडे यांचे आभार मानले आहेत.
0 Comments