सैनिकी विद्यालयास मुंबई येथील मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारिणी सदस्यांची सदिच्छा भेट
उदगीर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात मुंबई येथील मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारिणी सदस्य यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यालयाची पाहणी केली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अनिल महाजन, अनिल वाघमारे, कोषाध्यक्ष विजय जोशी, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जितेंद्र सिरसाठ, नागनाथ सोनटक्के, कमांडंट कमांडर बी. के.सिंह
व उदगीर येथील सर्वच पत्रकार बांधव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय जोशी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, सैनिकी विद्यालयाचा परिसर पाहून मी भारावून गेलो आहे. येथील वृक्ष लागवड खूपच सुंदर आहे. या परिसरात आल्यानंतर मन प्रसन्न झाले आहे. मी महाराष्ट्रातील चार, पाच सैनिकी शाळा पाहिल्या आहेत. त्यापैकी एक चांगली शाळा म्हणून मी उदगीरच्या सैनिकी शाळेचे नाव घेईन. येथील शिस्त, जेवण, मेसची व्यवस्था मला खूपच छान आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमांडंट कमांडर बी. के. सिंह यांनी पत्रकार हा समाजाचे वास्तव आपल्या लेखनीच्या माध्यमातून समाजासमोर ठेवण्याचे कार्य करतो. त्यांचे कार्य खूप महत्त्वाचे आहे.
अध्यक्षिय समारोपात संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, ४३ वे मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन होणार आहे. यासाठी जागेची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई येथील मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारिणी सदस्य उदगीर येथे येऊन त्यांनी सैनिकी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. तेव्हा सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महापुरुषांनी आपले प्राण अर्पण केले त्यांचा इतिहास समाजासमोर ठेवावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, नागेश पंगू, प्रल्हाद येवरीकर, मैनोद्दीन सय्यद, शंकर चितळे, प्रकाश शिंदे, नामदेव कोतागडे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments