प्रेरणादायी यशोगाथा
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय, जिद्द आणि चिकाटीने उच्च अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या अधिकाऱ्यांच्या वाटचालीला शब्दबद्ध करणारे प्रा. प्रतिभा बिस्वास (सोनवणे) यांचे "आयएएस प्रेरणा आणि अनुभव' हे बहुआयामी पुस्तक नागपूर येथील विजय प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
लेखिका नाशिकच्या भूमिकन्या असून मुंबईच्या अग्रगण्य कीर्ती महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.. व्यासंगी व्याख्याता आणि खुमासदार सूत्रसंचालिका म्हणूनही त्या ख्यातकीर्त आहेत. या पुस्तकात भारतीय प्रशासकीय सेवेसाठी अतिशय अवघड परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रासह देशभरातील विविध विभागांमध्ये उच्चपदस्थ सनदी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या २१ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बालपण, शिक्षण, परिवारीक परिस्थिती आणि आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांनी केलेले धडाडीचे कार्य यावर लेखिकेने अतिशय साधकबाधक आणि मोजक्या शब्दात वर्णन केले आहे. व्यस्त दिनचर्येतून या अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊन लेखन करण्याचे अवघड कार्य करताना लेखिकेचा कस लागला आहे. १९५२ च्या बॅचचे आयएएस रामप्रधान, टी. एन. शेषन, नीला सत्यनारायण, भारत सासणे, नितीन करीर, विकास खारगे, सूरज मांढरे, राधाकृष्ण गमे, लीना बनसोड, डॉ. विजय सूर्यवंशी, प्राजक्ता लवंगारे, विशाल सोळंकी, आस्तिक पांडे, डॉ. कुणाल खेमणार, डॉ. अभिजित चौधरी, शीतल तिली-उगले, रुबल अग्रवाल, अन्सार शेख, अमोल येडगे, रोहन घुगे यांची यशोगाथा वाचताना वाचकही भारावून जातील. नव्या पिढीने यांची प्रेरणा घ्यावी, असेही वाटते. पुस्तकातील साहित्यमूल्य अधोरेखित करणारे वैचारिक वाङ्मयही महत्त्वपूर्ण आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या शुभेच्छांसह संतुक गोलेगावकर यांचे मुखपृष्ठ उत्तम.
■आयएएस प्रेरणा आणि अनुभव डॉ. प्रतिभा बिस्वास, विजय प्रकाशन, नागपूर किंमत- ३५०/- रुपये.
0 Comments