लोणी पाणीपुरवठा योजनेसाठी 9.15 कोटी मंजूर
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची माहिती, ग्रामपंचायत च्या पाठपुराव्याला यश
उदगीर - उदगीर तालुक्यातील लोणी येथील बहुप्रतिक्षित पाणी पुरवठा योजनेस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे लोणी गावच्या पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई मंत्रालय येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीने उदगीर तालुक्यातील लोणी गावांसह इतर पाच गावांच्या एकुण 48 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेस मान्यता दिली आहे. त्यामुळे लोणी सह इतर गावांतील पाणी प्रश्न कायमचा मिटणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
मुंबई मंत्रालय येथे उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उदगीर तालुक्यातील लोणी गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 9.15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून संगाचीवाडी साठवण तलावातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
अनेक वर्षांपासून लोणीकरांच्या चर्चेचा विषय असलेल्या पाणीपुरवठा योजनेला अखेर मंजुरी मिळाली. विद्यमान सरपंच सौ. उषा यमुनाजी भुजबळे, उपसरपंच वैजनाथ बिरादार, ग्रामविकास अधिकारी बब्रुवान पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने या योजनेला मंजुरी दिली असून या योजनेचे काम लवकरच सुरू होणार व पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
आमच्या गावासाठी पाण्याच्या प्रश्न ज्वलंत झाला होता पण या पाणीपुरवठा योजनेमुळे निश्चितपणे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल,राज्यमंत्री संजय बनसोडे साहेब आणि सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार!
- उषाताई यमुनाजी भुजबळे
(सरपंच, लोणी)
0 Comments