माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार’ जाहीर
२७ नोव्हेंबरला राज्यपालांच्या हस्ते होणार वितरण
उदगीर : माजी मंत्री तथा उदगीर - जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांना मुंबई येथील साईदिशा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. उदगीर मतदार संघाचा कायापालट करुन देशाच्या नकाशावर उदगीरचे नाव कोरले. सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राला दिलेले पाठबळ. सार्वजनिक जीवनातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, शासनाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळताना जनकल्याणासाठी दिलेले योगदान तसेच समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण माने यांच्या माध्यमातून सन २००० पासून सामाजिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी आमदार संजय बनसोडे यांना ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
साईदिशा प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे . यामध्ये शासकीय सेवेसाठी ‘सेवा रत्न पुरस्कार’ महेंद्र कल्याणकर (IAS), विनिता देव सिंघल (IAS), अशोक काकडे (IAS), सुरज मांढरे (IAS), सुहास दिवसे (IAS), अजित कुमार (IAS) आणि स्वाती म्हसे पाटील (IAS) यांना प्रदान करण्यात आला आहे. ‘रणझुंजार पुरस्कार’ विजय सिंह (IPS) आणि बजरंग बनसोडे (DCP) यांना जाहीर करण्यात आला आहे.
अभिनय आणि चित्रपट क्षेत्रातील अनुपम खेर, सुनील शेट्टी, काजल अग्रवाल, अशोक सराफ, सयाजी शिंदे, भाऊ कदम, साई ताम्हणकर, मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर, कविता लाड, मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक कलाकारांचा पुरस्कारार्थीच्या यादीत समावेश आहे.
गायक - शंकर महादेवन, कुमार सानू, वैशाली सामंत, अजय-अतुल, सुरेश वाडकर, हृदयनाथ मंगेशकर, पियुष पानवर, स्वप्नील बांदोडकर, श्रीनिवास खळे, जगदीश खेबुडकर, यशवंत देव यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यांच्यासह अभिनय क्षेत्रातील अभिनेते, शासकीय सेवेतील अधिकारी, गायक, बालकलाकार व वैद्यकीय सेवेतील विविध मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे .
माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
************************


Post a Comment