देवणी पंचायत समितीची विकासकामांवर धडक मोहीम! तक्रारींची दखल घेत अचानक स्थळपाहणी
पाणंद रस्त्यांसह विहिरी, घरकुल व विविध रस्त्यांच्या कामांची होणार तपासणी; दोन गावांत पाहणीवेळी मजूर गैरहजर
गटविकास अधिकार सागर वरंडेकर यांच्या सूचनेनुसार अभियंता पी.बी. शेटे यांची पूर्वसूचना न देता पाहणी
देवणी : तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता व कामकाजातील नियमितता राखली जात आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी पंचायत समिती देवणी प्रशासनाने विशेष पाहणी मोहीम हाती घेतली आहे.
ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या विहिरींची कामे, प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुलांची कामे, पाणंद रस्ते तसेच गावांतर्गत व इतर सर्व प्रकारच्या रस्त्यांची कामे यासंदर्भात पंचायत समिती कार्यालयाकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांनी प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी जाऊन वस्तुस्थिती तपासण्याची मोहीम सुरू केली आहे.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनीही विकासकामांसंदर्भात तक्रार केली होती. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने प्रशासनाने केवळ कागदोपत्री अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यावर भर दिला आहे.
याच अनुषंगाने दि . 23 नोव्हेंबर 2026 रोजी गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती देवणी येथील अभियंता पी.बी. शेटे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता देवणी तालुक्यातील मौजे दवणहिप्परगा, मौजे बोंबळी व मौजे कोनाळी या तीन गावांतील पाणंद रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान मौजे दवणहिप्परगा येथे कामाच्या ठिकाणी एकही मजूर उपस्थित नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, संबंधित मजुरांची उपस्थिती कार्यालयात सादर करण्यात आलेली असतानाही प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी कामाच्या ठिकाणी मजूर आढळून आले नाहीत.
तसेच मौजे कोनाळी येथेही प्रत्यक्ष पाहणीदरम्यान एकही मजूर कामाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. याउलट मौजे बोंबळी येथे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मजूर काम करत असल्याचे आढळून आले.
तक्रारींची दखल; विकासकामांवर प्रशासनाची नजर!
ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणारी विकासकामे ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. विहिरी, घरकुल, पाणंद रस्ते आणि गावांतर्गत रस्त्यांसारख्या कामांचा थेट संबंध सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व लाभार्थ्यांशी येतो. त्यामुळे या कामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष कामांची तपासणी करणे, कामाच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या मजुरांची उपस्थिती पडताळणे, कामाची प्रगती तपासणे आणि शासकीय निधीचा योग्य विनियोग सुनिश्चित करणे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
यापुढेही देवणी तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची अचानक पाहणी करून कामकाजाची प्रत्यक्ष पडताळणी करण्यावर पंचायत समिती प्रशासनाचा भर राहणार आहे.
तक्रार कोणतीही असो, प्रशासनाकडून तिची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन वस्तुस्थिती तपासली जाणार, असा स्पष्ट संदेश या पाहणी मोहिमेतून मिळत आहे.
ग्रामीण विकासकामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व कायम राखण्याच्या दृष्टीने पंचायत समिती देवणीचा हा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरत आहे.


Post a Comment