कष्टकऱ्यांच्या चळवळीतून अण्णाभाऊंचे नेतृत्व आणि सोसलेल्या दुःखातून लेखणीचे प्रभुत्व बहरले - स्वप्निल अण्णा जाधव
उदगीर : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकऱ्यांचे जीवन जवळून पाहिले होते, जगले होते. त्यांच्या जीवनातील कष्ट आणि दुःख यांच्याही जीवनात अनुभवायला आले होते. उच नीच मानणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये कामगार पिळवटला जात होता, भांडवलदारांच्या हातचे बाहुली बनला होता. याला विरोध केला पाहिजे, या जाणिवेतून चळवळीला समृद्ध केले पाहिजे, अशा विचाराने स्वतः अण्णाभाऊ कष्टकऱ्यांच्या संघटन बांधणीमध्ये पुढाकार घेऊ लागले. पुढे त्यांना या चळवळीमुळे खूप त्रासही झाला, त्यासोबतच त्यांच्याकडे वेदनेची शिदोरी जमा झाली. वेदनेच्या शिदोरीच्या बळावरच अण्णाभाऊंच्या प्रतिभेने पंख पसरायला सुरुवात केली, आणि त्यातून एक समृद्ध वैभवशाली लिखाण परंपरा जन्माला आली. त्यांच्या साहित्यातील वास्तवदर्शी प्रगटीकरण लोकांच्या अंगावर शहारे आणणारा आहे. अण्णाभाऊंची जशी लेखणी बहरत होती, तशीच त्यांची शाहिरी देखील चळवळीला बळ देत होती. डफ आणि वाणीच्या माध्यमातून त्यांनी तरुण पिढीला प्रेरणा दिली. एक सामाजिक चळवळ त्यांनी उभा केली. आपल्या साहित्यातून दीनदुबळ्या समाजाचे दुःख व्यक्त केले. चव्हाट्यावर आणले. इतकेच नाही तर कष्टकरी चळवळीतील आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करावे, अशी भावना ठेवणाऱ्या तरुणांना नायकत्व देऊन एक मोठेपण त्यांनी दिले. त्यांच्या प्रभावशाली लेखनाने त्यांच्यावर आंबेडकरी विचारधारेचा प्रभाव होता, हेही स्पष्ट झाले आहे. जग बदल घालुनी घाव l
सांगून गेले मज भीमराव ll
या शब्दात त्यांनी समाज व्यवस्था बदलण्यासाठी जी भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती ती भूमिका पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी जणू आण्णाभाऊ साठे यांच्यावर येऊन ठेपली होती, तशा परिस्थितीत त्यांनी प्रभावशाली लेखन केले.
आज त्यांच्या साहित्याचे 27 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ते वास्तववादी लेखक म्हणून ओळखले जातात. असे विचार समाजसेवक तथा युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील विविध गावातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे प्रतीक कांबळे, छावा संघटनेचे दत्ता भोसले, बालाजी भोसले, टायगर सेनेचे संस्थापक जॅकीदादा सावंत, अजय सावंत यांच्यासह सुनील कांबळे, हनुमंत जाधव, गणेश जाधव, बाळासाहेब जाधव, उद्धव अंधारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना स्वप्निल जाधव म्हणाले की, साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या सैनिकांची निर्मिती केली. समाजवादी विचारधारा रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न कामगार चळवळीने गतिमान करून दाखवला. त्यामुळेच त्यांच्या एकूण साहित्य कृतीला आणि विचारधारेला रशियामध्ये प्राधान्य क्रमाने स्थान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अशा समाज विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या आणि कष्टकऱ्यांचे हित जपणाऱ्या अण्णाभाऊंची विचारधारा तरुणांनी आपल्यासमोर आदर्श म्हणून ठेवली पाहिजे. असेही स्वप्निल अण्णा जाधव यांनी सांगितले.
याप्रसंगी स्वप्निल अण्णा जाधव युवा मंच वतीने उदगीर आणि जळकोट तालुक्यातील अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांना टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात आणि शिवारात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करावे या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण केले आणि संवर्धन केले अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन पर पारितोषिक देण्याची ही घोषणा याप्रसंगी स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली.
0 Comments