भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करुन 150 कोटी जनतेची मने जिंकली
- क्रिडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांचे गौरवउद्गार
मुंबई : भारतीय संघाचा कणखर कर्णधार रोहित शर्माने आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवून चमकदार कामगिरी केली आणि दैदिप्यमान यश मिळवले. विराट कोहलीची दमदार फटकेबाजी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजी, अक्षर पटेल यांचे उत्तम क्षेत्ररक्षक, सुर्यकुमार यादवने पकडलेला चित्तथरारक झेल या सर्व खेळाडूंच्या एकजुटीने रोमहर्षक सामन्यात 17 वर्षानंतर टी- 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करुन विश्वचषकावर भारताने नाव कोरले आहे. आणि दीडशे कोटी जनतेची मने जिंकली, खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा भारतीयांना रास्त अभिमान आहे असे गौरवउद्गार क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काल माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.
वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा सन्मानाचा सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. या प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी भारतीय संघाचे स्वागत करीत सदिच्छा दिल्या. तसेच प्रशिक्षक, संघातील सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभिनंदन केले.
पुढे बोलताना क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले, अथक परिश्रम घेऊन भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी उत्तम मार्गदर्शन करत भारतीय संघाचे मनोबल वाढविले आहे. हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी सांगीतले.
0 Comments