GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या कार्यशाळेत अग्निशमन यंत्रणा वापराबाबत मार्गदर्शन

खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या कार्यशाळेत अग्निशमन यंत्रणा वापराबाबत मार्गदर्शन

लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयोजन 
लातूर : 1 जुलै 2023 रोजी समृध्दी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सला अपघात होऊन आग लागल्याने झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर लातूर प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरगपार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय, माझा परिवार व लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जुलै 2023 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे खासगी ट्रॅव्हल्ससाठी कार्यशाळा झाली. यावेळी आपत्कालीन परिस्थितीत वाहनातील अग्निशमन यंत्रणा वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये,  सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष जुगलकिशोर तोष्णीवाल व सुनिल देशपांडे, महानगरपालिकेतील अग्निशामक दलाचे श्री. कासले, माझा परिवारचे श्री. तांदळे, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहा. मोटार वाहन निरीक्षक, कर्मचारी वर्ग तसेच कार्यालयात आलेले वाहनधारक, नागरिक, ट्रॅव्हल्स चालक यावेळी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या सुरुवातील मोटार वाहन निरीक्षक सविता पवार यांनी वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. सुनिल देशपांडे यांनी अपघात होऊ नयेत, यासाठी ट्रॅव्हल्स चालकाने जबाबदारी वाहन चालविण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत ट्रॅव्हल्स मधील प्रवासी यांना बाहेर पडण्यासाठी मदत करावी, असे सांगितले.

महानगरपालिकेतील अग्निशामक दलाचे श्री. कासले यांनी आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यामध्ये आगीचे कारण, प्रकार व आग आटोक्यात आणण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत, त्यासाठी कोणत्या साहित्य उपलब्ध आहेत, या बाबतची माहिती दिली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्याचे प्रात्याक्षीक करुन दाखविले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी खासगी ट्रॅव्हल्सला आग लागून झालेल्या भीषण अपघाताबाबत माहिती देऊन अशा प्रकारच्या अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ट्रॅव्हल्स मालक आणि चालक यांनी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. तसेच ट्रॅव्हल्स मालक व चालकांनी वाहनातील अग्निशमन यंत्र व आपत्कालीन दरवाजा याचा कसा वापर करावा याविषयी प्रवाशांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वाहन चालकाने घाबरुन न जाता जास्तीत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करुन प्रवाशांचे जीव वाचवावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. भोये यांनी केले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक सविता पवार यांनी केले. सहायक मोटार वाहन निरीक्षक मन्मथ कुदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

खासगी प्रवासी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी सूचना

• वाहनाची सर्व कागदपत्रे वैध असल्याची खात्री करावी
• वाहनात प्रथमोपचारपेटी व अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत व कार्यान्वित असावी.
• आणीबाणीच्या प्रसंगी पाठीमागील बाजूला असणाऱ्या आपत्कालीन दरवाजाचा वापर करावा.
• आपत्कालीन परिस्थितीत वाहनाच्या काचा फोडण्यासाठी हातोडा वापरावा.
• प्रत्येक प्रवाश्यांनी तिकीट बुकिंग करताना स्वतःचा मोबाईल क्रमांक व्यतिरिक्त नातलगाचा मोबाईल क्रमांक द्यावा.

Post a Comment

0 Comments