गंभीर आजाराच्या उपचारासाठी शासकीय स्तरावरुन मदत करणार : राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीर : उदगीर येथे राबवण्यात येत असलेल्या मोफत सर्वरोग शिबिराच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य चांगले आहे यातून जर कोणास काही गंभीर आजार असेल तर त्यांना पुढील उपचारासाठी लातूर, पुणे, मुंबई येथे जावे लागले तर त्यांना पुढील उपचारासाठी शासन स्तरावरून मदत केली जाईल असे आश्वासन पाणी पुरवठा व स्वच्छता, पर्यावरण , सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
जन परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीरच्या वतीने मुसा नगर, फुले नगर, समाज मंदिर सोमनाथपुर रोड येथे मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते, यावेळी ते म्हणाले की, या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा, जर एखादा मोठा आजाराचा रुग्ण आढळले तर त्यांना पुढील उपचारासाठी राज्याचा मंत्री म्हणून जास्तीत जास्त मदत करण्याचे काम करेन , कोरोना संपला नाही काळजी घ्यावी, आपले आरोग्य निरोगी ठेवा असेही ना. संजय बनसोडे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, निराधार योजना श्रावणबाळ योजना याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, गेली अनेक दिवसापासून येथील काबल्या चा प्रश्न आहे यासाठी तहसीलदार यांनी लक्ष घालावे , त्यांच्या काय अडचणी आहेत ते पाहून लवकरात लवकर तो विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, येणाऱ्या काही दिवसात हा विषय मार्गी लाववेत अशा सूचना ही राज्यमंत्री ना .संजय बनसोडे यांनी दिल्या. मुस्लिम समाजाच्या विविध कार्यासाठी त्यांना जागेची अडचण येत होती त्यासाठी भरपूर निधी मंजूर झाला आहे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध बौध्द विहारा सारखे येथेही बौद्ध विहार करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे 14 एप्रिल पर्यंत ते काम पुर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष समीर शेख, धनावांतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चे प्राचार्य डॉ दत्तात्रय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ कापसे, मधुर डायबेटीज चे डॉ प्रशांत नवटक्के, डाॅ.दत्तात्रय पवार, डाॅ.भाग्यश्री घाळे, माजी नगरसेवक गजानन सताळकर, पद्माकर उगिले, शशिकांत बनसोडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड, सचिव सिध्दार्थ सुर्यवंशी, नागनाथ गुट्टे, संग्राम पवार, जितेंद्र शिंदे, जकी पटेल हे होते.
हा कार्यक्रम जन परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीरचे शमशोदीन शेख, अझरुद्दीन शेख यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यात विविध आजाराची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रदीप जोंधळे यांनी केले.
0 Comments