मानवी प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास- प्रा. डॉ. राहुल आलापुरे
उदगीर : अलीकडच्या काळात वाढलेली वृक्षतोड, प्लॅस्टिकचा मोठा वापर याचा पर्यावरणावर परिणाम होत असून याबाबत जनजागृती आवश्यक असताना ती होत नाही, उलट मानवी प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हासच होत आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. राहुल आलापुरे यांनी केले.
उदगीर येथील वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित ८७ वा धर्मवीर संग्रामप्पा शेटकार वचन सप्ताह व्याख्यानात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र प्रमुख प्रा. डॉ. राहुल आलापुरे यांनी पर्यावरण व शाश्वत विकास या विषयावर शनिवारी ४ थे पुष्प गुंफले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ आडत व्यापारी मल्लिकार्जुनप्पा बिरादार, लंजवाडकर होते. यावेळी बसवपिठावर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी, वीरशैव समाजाचे सदस्य अँड. एस. टी. पाटील उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्रा. आलापुरे यांनी, महात्मा बसवेश्वरांनी माणसाला माणूस म्हणून जगविण्याचा संदेश दिला असे सांगत आज आपण भौतिक प्रगतीकडे जात असताना पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे मात्र दुर्लक्ष करीत आहोत, प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्षतोड यामुळे घनदाट अरण्याऐवजी वाळवंट निर्माण होत आहेत. व एकूणच संपूर्ण जैव विविधता धोक्यात आली आहे. अलीकडच्या काळात प्लॅस्टिकचा देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, याचाही पर्यावरणावर परीणाम होत असून मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे असे म्हणाले. यावेळी बोलताना प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी, केमिकलयुक्त अन्नधान्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. मागच्या शंभर वर्षात जगाचे तापमान दीड डिग्रीने वाढले आहे व याचा परिणाम समुद्र पातळी काही मिलीमीटरने वाढेल आणि महासागर व समुद्र यांच्या लगतची शहरे पाण्याखाली जातील असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात लंजवाडकर यांनी कर्ज होईल असे खर्च करू नका, पाप होईल अशी कमाई करू नका, दुःख होईल असे बोलू नका व रोग होईल असे खाऊ नका असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस म. बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वीरशैव समाजाचे सचिव अँड.श्रीकांत बडीहवेली यांनी केले. सूत्रसंचालन व आभार रविंद्र हसरगुंडे यांनी केले. कार्यक्रमास समाजबांधव उपस्थित होते.
0 Comments