जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा
देण्याची राज्यमंत्री संजय बनसोडे यांची मागणी
लातूर : जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी बांधकाम व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्र्यांना एका लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व बाबींची चौकशी करून सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे माहिती श्री. बनसोडे यांनी दिली आहे.
जळकोट तालुका हा डोंगरी दरी कपारीत पर्वतरांगांमध्ये वसलेला असून एकूण 47 गावे व वाडी तांडा अशी आहेत. एक हंगाम खरिपाचा डोंगरी व मजुरा चा तालुका म्हणून याची ओळख संबंध महाराष्ट्रात आहे. जळकोट तालुक्यातील घोंशी सर्कल मधील गुप्ती आतनूर, गव्हाण, मर सांगवी डोंगरगाव, डोंगर कोनाळी, शिवाजीनगर तांडा, शेलदरा उमरदरा, केकत सिंदगी, काटेवाडी, रावणकोळा हळद वाढवणे हे अनेक गावे व पंधरा ते वीस तांडे पर्वतरांगेत डोंगरात दरी कपारीत वसलेले आहे.
नैसर्गिक हा तालुका डोंगरीच आहे मात्र याकडे अद्याप लक्ष कोणी दिले नाही. त्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा दिला तर या तालुक्यातील गोर गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणात आरक्षण मिळेल नोकरीत आरक्षण मिळेल वयोमर्यादेत आरक्षण मिळेल व गोरगरीबांचे मुलं शिक्षण घेऊ शकतील नोकरीला लागतील व्यवसायासाठी या डोंगरी तालुक्याचा दर्जा चा फायदा होईल. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम होईल म्हणून माननीय मुख्यमंत्री यांनी या तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा अशी विनंती मुंबईत प्रत्यक्ष भेटून बांधकाम व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली आहे.
जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा एक खास बाब म्हणून मिळवून देणारच अशी ग्वाही श्री. राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली आहे.
***
0 Comments