नव्या आर्थिक वर्षात लातूर जि.प.चे सीएमपी प्रणालीने वेतन : जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे
विलंब व वेळेचा अपव्यय टळणार
लातूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार व देयके आता सीएमपी प्रणालीद्वारा होणार असून त्याची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात करण्याचा निर्धार जि.प.चे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केला आहे.
लातूर जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारी देयके देण्याच्या पारंपारिक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. पूर्वीच्या पद्धतीमुळे होणाऱ्या समस्यांमुळे होणाऱ्या विलंबाला आता टाटा मिळणार आहे. यामुळे प्रक्रियेला होणारा विलंब ,धनादेश गहाळ होणे, चुकीच्या खात्यावर रकमा जमा होणे यासारख्या प्रकारांना आळा बसणार असून वेळेचा अपव्यय वाचून पारदर्शकता येणार आहे. याचा लाभ पाच हजारांपेक्षा जास्त शिक्षक मुख्याध्यापकांना होणार आहे. अध्यक्ष राहुल केंद्रे व उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके यांनी वारंवार बैठका घेत या विषयाला चालना दिली.
वित्त विभागामार्फत विविध विभागाच्या योजनांचे अनुदान लाभार्थी, कर्मचारी यांना प्रचलित पद्धतीनुसार धनादेशाद्वारे अदा केले जात होते. परंतु देयकातील पारदर्शकता तसेच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून यापुढे जि.प. प्रशासनामार्फत वितरित हाेणाऱ्या विविध रकमा, अनुदान हे आता एसबीआयमार्फत सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) प्रणालीद्वारे केली जाणार आहे.
राज्यात पुणे, जालना जिल्ह्यातील प्रयोगानंतर एकूणच सर्व विभागांसाठी सीएमपी प्रणाली राबवणारी लातूर जिल्हा परिषद अग्रगण्य ठरणार आहे.
शिक्षण विभागाच्या शालार्थ टीम ने मागील सहा महिन्यांपासून शिक्षकांच्या वेतनाची सीएमपी प्रक्रिया यशस्वी करून दाखवन्याची तयारी केली आहे. त्याद्वारे दरमहा 5 हजारांपेक्षा अधिक शिक्षक, मुख्याध्यापकांच्या खात्यामध्ये वेतन रक्कम व कपाती अचूक वर्ग करण्यात येतील .
त्यामुळे शिक्षक वेतन महिन्याच्या एक तारखेस अदा होईल. यापूर्वी वेतनास होणारा विलंब व आर्थिक भुर्दंडापासून शिक्षकांचा बचाव होईल . त्याच धर्तीवर आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी एसबीआय सीएमपी प्रणालीचा स्वीकार करून देयक मंजुरीनंतर देय रक्कम ठेकेदार, लाभार्थी, कर्मचाऱ्यांना तसेच विभाग प्रमुखांना थेट बँक खात्यात ऑनलाइन एसबीआय सीएमपी एनईएफटीद्वारे वर्ग केले जाणार आहे. या प्रणालीचे फायदे लक्षात घेता वित्त विभागासह सर्व विभाग, पंचायत समितीमध्येही प्रणाली लागू करावयाची आहे. या प्रणालीची माहिती देण्यासाठी तसेच ती लागू करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरील सर्व विभाग प्रमुख तसेच पंचायत समिती स्तरावरील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्थ रोखपाल शाखेच्या कर्मचाऱ्यांना या प्रणालीचा डेमो सादर केला जाणार आहे.
यासाठी सर्व विभाग प्रमुख, बीडीओ, स. लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ तसेच रोखपाल यांना कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेतील विविध कल्पक, नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे, लोकहितोपयोगी बाबींमुळे लातूर जिल्हा परिषद राज्यस्तराकरिता मार्गदर्शक ठरत आहे.जि.प,अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे वैविध्यपूर्ण उपक्रमांची आखणी करीतआपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखविली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग), पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षणाधिकारी (प्रौढ), शिक्षणाधिकारी (निरंतर), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग-जालना, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अशा विविध विभागांतून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदीचा आढावा घेणे सीएमपी प्रणालीतून सोपे होणार आहे.
नव्या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यापासून लातूर जिल्हा परिषद सीएमपी प्रणाली लागू करेल असे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले .
0 Comments