कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी
आरटीसीपीआर व रॅपिड अँन्टीजन टेस्ट वाढविण्याच्या सूचना
लातूर : जिल्ह्यात कोरोना (कोवीड-19) या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने आरटीसीपीआर व रॅपिड अँन्टीजन टेस्ट वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोरोना लसीकरण कार्यक्रांतर्गत जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महानगर पालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मणराव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, डब्ल्यू,एच.ओ. चे प्रतिनिधी डॉ.अमोल गायकवाड उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले की, जिल्हयात कोरोना संसर्गाचे रुग्ण् संख्या वाढतच आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने आरटीसीपीआर व रॅपिड अँन्टिजन टेस्ट ची संख्या वाढवून कोरोना संसर्गावर मात करावी. यावेळी त्यांनी जिल्हयात कोविड-19 च्या लसीकरणा विषयी जिल्हयातील सर्व तालुक्यात लसीकरणाच्या नियोजनाबाबतचा आढावा घेतला व संबंधितांनी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हयात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य विभागाने शासन निर्णयातील पालन करुन आरोग्य सुविधा उपलब्ध् करुन दयाव्यात असे निर्देश त्यांनी दिले. कोवीड-19 च्या लसीकरण बैठकीत जिल्हा लॉकडाऊन काळातील आरोग्य विभागाच्या सर्व विभागाचा आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिल्या.
प्रारंभी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.अर्चना पंडगे यांनी प्रस्ताविकात जिल्हयात कोवीड-19 च्या लसीकरणाबाबतच्या आराखडयाची माहिती पीपीटी व्दारे सविस्तर विषद केली. या बैठकीस कोरोना जिल्हा समन्वय समितीचे सर्व सदस्य, तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शेवटी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments