अनसरवाडाच्या रुमा बचत गटाच्या
गोधडीची ॲमेझॉन वर भरारी !
ॲमेझॉन वर वस्तू विक्री करणारा जिल्ह्यातील पहिला बचत गट !
लातूर :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद च्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील रुमा हा बचत गट पारंपरिक हस्तकारी गोधडी बनविण्याचा व्यवसाय करते. लातूर जिल्ह्यात व परिसरात या गोधडी ला चांगली मागणी आहे. सध्याच्या इंटरनेटच्या युगात ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच बाबींचा विचार करून रुमा बचत गटाने आपली पारंपरिक हस्तकारी गोधडी अमेझॉन या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर विक्री साठी नोंदणी केली. व अशी नोंदणी करणारा रुमा हा जिल्ह्यातील पहिला बचत गट ठरला आहे, अशी माहीती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटांच्या माध्यमातून संघटन करून त्यांना संघटनात्मक नेतृत्व, आर्थिक साक्षरता व व्यवसायिक कौशल्य आशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून त्यांना व्यवसायिक संधी देऊन त्यांची उपजिविका वृद्धी करण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यात प्रभावीपणे राबवित आहे.
लातूर जिल्हयात या अभियानांतर्गत स्थापित बचत गटांच्या महिलांनी छोटे- मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले असून त्या व्यवसायातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. सद्याच्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून महिला बचत गट उद्योगात मोठी भरारी घेताना दिसत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील उमेदच्या रुमा बचत गटाने सुरू केलेले पारंपरिक गोधडी हे उत्पादन आता नामांकित अमेझॉन या ऑनलाईन शॉपवर उपलब्ध झाले आहे.
प्राचीन काळातील लोप पावत चाललेली ग्रामीण भागात उदयास आलेली हस्तकारी गोधडी या उत्पादनास यामुळे खरोखर पुनरूज्जीवन मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या अभिनव संकल्पनेमुळे तसेच त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे आज ग्रामिण भागातील बचत गटांच्या महिला या पारंपरिक उत्पादनाने आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे दिसून येत आहे.
पुढील काळातही जिल्ह्यतील उमेद बचत गटांची सोया नट्स, सोया कॉफी, बेबी बेडिंग व खास ग्रामीण भागातील चटण्या व मसाले इत्यादी उत्पादने अमेझॉन ऑनलाईन शॉपवर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहेत.
रुमा बचत गट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या नियोजनबद्ध पाठपुराव्यामुळे तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे व जिल्हा व्यवस्थापक विपणन वैभव गुरले यांनी महिलांना दिलेल्या प्रेरणेमुळे हे साध्य करणे शक्य झाले. या कामी उमेद तालुका अभियान व्यवस्थापनक भगवान अंकुश यांनी व सर्व तालूका चमूने यशस्वी परिश्रम घेतले, या बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी कौतुक केले असून भविष्यात जास्तीत जास्त बचत गटांनी ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करण्यात यावी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
0 Comments