तिरु नदीवरील 7 बॅरेजेसच्या उभारणीसाठी सर्वेक्षण व अन्वेषणास मान्यता
राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नांना यश
उदगीर : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद , लातूर यांचे मार्फत सुमारे 25 ते 30 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील एकूण 7 कोपबंधा-याचे बॅरेजेस मध्ये रुपांतरण विस्तार व सुधारणा करण्यास जलसंपदा विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार व राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल , सार्वजनिक बांधकाम( सार्वजनिक उपक्रम ), रोजगार हमी, भूकंप व पुनर्वसन, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या पुढाकाराने या महत्त्वाकांक्षी योजनेस मान्यता मिळाली आहे.
या प्रकल्पामुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील सुमारे 500 हेक्टर पेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाची 2.24 द. ल. घ. मी. इतकी पाणी साठवण क्षमता आहे. या योजनेमुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरीत क्रांती घडुन येणार आहे. या प्रकल्पासाठी लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत विलासरावजी देशमुख, तत्कालीन माजी आ. दिवगंत नारायणराव पाटील , दिवंगत माजी आ. चंद्रशेखर भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी विशेष लक्ष घालून पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला. या प्रकल्पाला जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या मजुंरीमुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वेक्षण व अन्वेषणासाठी 53.29 लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्याकडुन जलसंपदा विभागाकडे विषयांकित प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्या अनुषंगाने ही मान्यता देण्यात आली आहे.
यासंबंधी जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई येथील अवर सचिव रो. र. पोळ यांनी दि. 26 नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमित केले असून तालुक्यातील 7 कोपबंधा-याचे बॅरेजेमध्ये रुपांतरण करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षण व अन्वेषण करण्यासाठी कळविण्यात आले आहे.
बेळसांगवी येथील कोपबंधा-याचे सर्वेक्षण व अन्वेषणासाठी 7.62 लक्ष रुपये, बोरगाव - 8.13 लक्ष रुपये, तिरुका - 7.59 डोंगरगाव क्रमांक 1 - 7.28 लक्ष, डोंगरगाव क्रमांक 2 - 7.28 लक्ष रुपये, सुल्लाळी - 7.37 लक्ष रुपये, गव्हाण - 7.71 लक्ष रुपये याप्रमाणे सर्वेक्षण व अन्वेषणासाठीच्या 53.59 लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
विषयांकित सर्वेक्षण व अन्वेषण करण्याच्या अंदाजपत्रकास सक्षम स्तरावर प्रशासकीय तसेच तांत्रिक मान्यता देऊन निविदा प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.सर्वेक्षण व अन्वेषण सुरू करण्यापूर्वी विषयांकित 7 कोपबंधारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने विधिवत पद्धतीने जिल्हा परिषद, लातूर यांचेकडून हस्तांतरित करुन घेतले आहेत.
0 Comments