उदगीर : “कमी पैशात हमखास व दर्जेदार नोकरी मिळवण्याचा राजमार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा,” असे प्रतिपादन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले. त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘उदयोत्सव 2025-26’ च्या समारोप कार्यक्रमात बोलताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया होते. या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार राम बोरगावकर विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. आपल्या मार्गदर्शनात बोरगावकर यांनी विद्यार्थीदशेतच स्पर्धा परीक्षेची नियोजनबद्ध, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण तयारी केल्यास साध्या कुटुंबातील मुलांनाही कमी खर्चात शासकीय सेवेत प्रवेश मिळू शकतो, असे सांगितले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासनात गेल्यानंतर आईवडिलांनी केलेले कष्ट, समाजाचे ऋण आणि शिक्षणसंस्थेचे मोलाचे योगदान फेडण्याची संधी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला अभ्यासयोजना, संदर्भ ग्रंथांची निवड, वेळेचे नियोजन आदी बाबत स्वतःकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. ग्रामीण व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांनी संकोच न बाळगता पुढे येऊन स्पर्धा परीक्षेद्वारे आपले व कुटुंबाचे भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. या समारोप कार्यक्रमात महाविद्यालयातर्फे आयोजित विविध सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात आली थोडक्यात विवेचन करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी तसेच कर्मचारी यांच्यासाठी समूह भोजनाची व्यवस्था महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आली होती. ‘उदयोत्सव’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी योग्य दिशा मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मस्के यांनी तर सूत्रसंचालन शिवनंदा रोडगे यांनी केले यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, श्रीकांत मध्वरे, शिवराज वल्लापुरे, प्रा. अडेप्पा अंजुरे, भीमाशंकर मुद्दा, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा हाच नोकरीचा खरा राजमार्ग : तहसीलदार राम बोरगावकर
Janstambh
0



Post a Comment