शंभर टक्के मतदानासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत : उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे
उदगीर : लोकशाहीच्या महोत्सवात शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी केले .
ते मातृभूमी महाविद्यालय , कस्तुरबाई नर्सिंग स्कूल , मातृभूमी नर्सिंग स्कूल आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित मतदान जनजागृती पथसंचलनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, नायब तहसीलदार संतोष गुट्टे ,प्राचार्या उषा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी, एका मताचे महत्त्व पटवून दिले एका मतामुळे खूप मोठा बदल होऊ शकतो हे समजावून सांगत स्वतः तरी मतदान कराच परंतु आपले काका - काकू , आजी - आजोबा व शेजारी यांनाही मतदानासाठी आवाहन करण्यासाठी सांगितले.
तहसीलदार राम बोरगावकर यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व समजून सांगताना सर्वत्र सध्या सोशल मीडियावर राज्यकर्त्यांनी काय केले पाहिजे याबद्दल सल्ले दिले जातात मात्र अशा व्यक्ती मतदान करत नाहीत अशी खंत व्यक्त करून आपणास योग्य वाटतो तो उमेदवार निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले .
नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरातूनच मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन केले. जनजागृती पथसंचलनाची सुरुवात मातृभूमी महाविद्यालयात करत छञपती शिवाजी महाराज चौक ,पोलीस स्टेशन येथे जावुन परत समारोप मातृभूमीत करण्यात आला. कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले.
यावेळी प्राचार्य उषा कुलकर्णी , प्रा. सय्यद उस्ताद , प्रा. रणजित मोरे , प्रा. अश्विनी कुलकर्णी, प्रा.राजेश चटलावर , प्रा.रुपाली कुलकर्णी , संगम कुलकर्णी , अन्वेश हिप्पळगावकर, रणक्षेत्रे रेखा , मीरा बिरादार , उषा सताळकर , ओंकारे जगदीशा ,राहुल जाधव , आकाश पवार , शितल पवार , नवनाथ पंदे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते .
0 Comments