आश्वासन पूर्ण करूनच जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे बसले अश्वावर
उदगीर : अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर होनीहिप्परगा ग्रामस्थांनी मिरवणुकीसाठी आणलेल्या अश्वावर स्वार न होता कार्यारंभाचा आदेश काढूनच जि.प.अध्यक्ष केंद्रे यांनी वचनपुर्तीनंतरच अश्वावर स्वार होऊन होनीहिप्परगा ग्रामस्थांच्या भावनेचा सन्मान केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या लोहारा गटातील होनीहिप्परगा ग्रामस्थांनी केंद्रे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मागच्या वर्षी ७ फेब्रुवारी रोजी सत्काराचे आयोजन केले होते.त्या दिवशी ग्रामस्थांनी केंद्रे यांची अश्वावरून मिरवणूक काढण्यासाठी घोडा पण आणून उभा केला होता.मात्र आश्वासित केलेली कामे पूर्ण केल्याशिवाय आपण घोड्यावर बसणार नसल्याचे नम्रपणे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले .
याचवेळी होनीहिप्परगा गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचा शब्द देत लागलीच फ्लेवर ब्लाॕकच्या कामाचेही आश्वासन दिले होते.हे फ्लेव्हर ब्लाॕकचे दहा लाखाचे काम पूर्ण झाले असून पाणीपुरवठा योजनेला पण मंजुरी देण्यात आली आहे.
शुक्रवारी जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे हे होनीहिप्परगा येथील हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आले असताना ग्रामस्थांनी अश्वावरून मिरवणूक काढीत आश्वासनपूर्तीचा व केंद्रे यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केला.
0 Comments