GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22 ते 24 एप्रिल 2022 या कालावधीत

95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22 ते 24 एप्रिल 2022 या कालावधीत

संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची एकमताने निवड

संमेलनाच्या स्वागताध्यपदी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांच्या नावाची चर्चा!

उदगीर :  येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनांक 22 ते 24 एप्रिल 2022 या कालावधीत होणार असून संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची एकमताने निवड झाल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, उपाध्यक्ष कपूर वासनिक, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र काळुंखे, विलास मानेकर, प्रदीप दाते, डॉ. विद्या देवधर, प्रा. किरण सागर, के. एस. आतकरे, दिनेश सास्तुरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर .के .मस्के यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. मराठी, कन्नड, तेलगू, उर्दू , हिंदी या भाषांच्या बहुसांस्कृतिक ठिकाणी हे संमेलन होत आहे. ते आगळे वेगळे होईल आणि या भागातील साहित्यिकांना संधी आणि प्रेरणा देणारे संमेलन ठरेल, अशी अपेक्षा कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलनामध्ये सर्व विचारांना सोबत घेऊन जात, गट, पक्ष यापलीकडे जाऊन निखळ साहित्यिक वातावरणात अतिशय उत्साहात आगळेवेगळे साहित्य संमेलन करण्यासाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय कटिबद्ध आहे, अशा प्रकारची भावना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी व्यक्त करून महामंडळाने  संमेलन आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.।

संमेलनाच्या स्वागताध्यपदी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांच्या नावाची चर्चा आता शहरात होत असुन मसापच्या प्रयत्नतुन असून याची धुरा या आता कोणाच्या खाद्यावर येणार या बद्दल उत्सुकता लागली आहे. पण याबद्दल अजून कसलीही घोषणा अद्याप तरी झाली नाही.


अध्यक्षांचा परिचय...
भारत जगन्नाथ सासणे (जन्म :२७ मार्च १९५१). मराठी कथाकार. जालना येथे जन्म. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्‌सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली.

१९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते; त्यांच्या कथांमधून व्यक्त होणारे जीवनानुभव हे नावीन्यपूर्ण, असांकेतिक, गूढगहन व चमत्कृतिपूर्ण असतात, पण त्यांचे वास्तवाशी घट्ट अनुबंध जुळवलेले असतात. त्यांच्या कथांतून ग्रामीण, आदिवासी, नागर असे समाजजीवनाचे विविध स्तर व त्या सामाजिक परिसरात जगणारी, वैशिष्ट्यपूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसे भेटतात. मानवी जीवनाची अतर्क्यता व असंगतता, मानवी नातेसंबंधांतील ताणतणाव, व्यक्तीच्या मनोविश्वातील गूढ, व्यामिश्र व अनाकलनीय गुंतागुंत, त्यांचे सूक्ष्म, अनेक पदरी चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा स्वाभाविकपणेच दीर्घत्वाकडे झुकतात. कित्येकदा या कथांतून गंभीर, शोकाकुल, व्यामिश्र भावजीवनाचा विलक्षण अस्वस्थ करणारा प्रत्यय येतो. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडून दाखवतात.

काही कथांतून मुस्लिम संस्कृतीच्या छायेत जगणाऱ्या मराठवाड्यातील शहरांचे व व्यक्तींचे सखोल, तपशीलवार चित्रण आढळते. त्यांच्या कथनशैलीत कथाशयाला अनुरूप अशा अन्वर्थक प्रतिमा, प्रतीके, तरल काव्यात्मता, गूढ चमत्कृती (फॅंटसी) अशा अनेकविध घटकांचा सुसंवादी मेळ साधलेला दिसतो. माणसाला केंद्रबिंदू मानणाऱ्या व मनुष्यजीवनाबद्दल अपार करुणा व्यक्त करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. भारत सासणे यांच्या डफ या दीर्घ कथेवर प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे हे 'काळोखाच्या पारंब्या'या नावाचा चित्रपट दिग्दर्शीत करीत आहेत या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेमध्ये स्वतःही काम करत आहे.

Post a Comment

0 Comments