उदगीर शहरात खुलेआम गुटखा विक्री ?
होलसेल डिलर बिनधास्त देतात गुटखा; संबंधित विभागाचे दुर्लक्ष !
उदगीर : शहर तीन राज्याच्या सीमेवर असल्याने येथील बाजारपेठ मोठी आहे. शहरातील हजारो पान टपऱ्या आणि हॉटेलला खुलेआम गुटखा विक्री केली जाते. शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याच्या आहारी तरुण पिढी जात असल्याने पालकातून चिंता व्यक्त केली जात असून शहरातील काही मोजक्या ठिकाणी अवैधरित्या गुटखा साठवून ठेवून तो गुटखा दुचाकी व अॅटो मधून शहरातील विविध भागात पुरवठा करण्याचे काम सर्रासपणे चालू आहे.
संबंधित गुटखा विक्रेते हे कोणाच्या आशीर्वादाने शहरात खुल्या पध्दतीने गुटखा विक्री करत आहे हा संशोधनाचा विषय असुन मागील काळात शहरातील विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी उदगीर शहरातील गुटखा बंद करण्याची मागणी केली होती मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले असून येत्या काळात तरी उदगीर शहरात गुटखा हद्दपार होणार का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तरुण पिढी गुटख्याच्या आहारी जाऊन विविध आजारांना बळी पडून अनेकांचे प्राणही गुटखा सेवनामुळे गेले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे शासनाने कडक कायदा करूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात उदगीर शहरात गुटखा येतो कुठून हा मोठा प्रश्न आहे. या बाबीकडे प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला असुन शहरातील गुटखा बंद नाही झाला तर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठे जन आंदोलन उभारणार असल्याचे जनस्तंभ न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले आहे.
0 Comments