भारतीय संविधानाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची - प्राचार्य डॉ. सुधीर जगताप
उदगीर : भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.
स्वतंत्र झालेल्या भारताला एक राष्ट्र म्हणून किंवा लोकांच्या कल्याणासाठी यापुढे देशाची राज्यव्यवस्था कशी असावी,आपला स्वतंत्र भारत देश कोणते नियमाने कायद्यांच्या चौकटीमध्ये राहून या स्वातंत्र्याचा अगदी आनंदाने उपभोग घेणार. या सर्वांसाठी काही एक नियम बनवणे आवश्यक होते. या कामासाठीच म्हणून घटना समिती स्थापन करण्यात आली.भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी जी घटना समिती नेमली होती. त्या घटना समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या कालावधीत अथक परिश्रम घेत भारताला जगातील सर्वात मोठे व लिखित संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी दिले आणि या संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. आणि तेव्हापासून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. आपणास एक नागरिक म्हणून सन्मानाने जगण्याचे अधिकार या संविधानाने दिले आहे म्हणून देशातील प्रत्येक नागरिकांनी या संविधानाचे संवर्धन आणि संरक्षण केले पाहिजे असे मत स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी केले.
येथील स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशांत जगताप, संस्थेच्या व्यवस्थापिका ज्योती स्वामी,जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश तोलसरवाड,नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.ज्योती तारे,फोलोरन्स नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागसेन तारे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख व परीक्षा नियंत्रक डॉ.शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे,नॅबेटच्या समन्वयक मनोरमा शास्त्री, अतेंद्र सिंग,जय हिंद पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य सतीश वाघमारे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. सुधीर जगताप म्हणाले की,प्रजासत्ताक
म्हणजे प्रजेचे राज्य होय आणि याचं प्रजेला आपली लोकशाही आणि संविधान टिकवून ठेवण्याची व ती अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी आहे. या संविधानाने आपल्याला समता,बंधुता,न्याय ही तत्वे दिली. आपले जगणे सुकर होण्यासाठी मूलभूत अधिकार दिले. आज जी आपल्या देशाची प्रगती झपाट्याने होत आहे ते या संविधानामुळे. आपल्याला या संविधानाच्या चौकटी मध्ये राहूनच जगावे लागते. हे संविधान कोणा एकाचे नसून ते या देशातील जनतेचे आहे. असे ही ते म्हणाले.
यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा, सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


Post a Comment